पर्यावरणाच्या रक्षणासाठी वंचित बहुजन युवा आघाडीची ठाम भूमिका – वीटभट्ट्यांवरील कारवाईसाठी तहसिलदार यांच्याकडे निवेदन
शहादा तालुक्यातील वाढते पर्यावरणीय प्रदूषण आणि नियमबाह्य वीटभट्ट्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, याबाबत वंचित बहुजन युवा आघाडीने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
आज दि. [29/04/2025] रोजी लक्ष्मण शिवाजी निकुंभे, तालुकाध्यक्ष – वंचित बहुजन युवा आघाडी, शहादा ,रवींद्र भादू मोरे वंचित बहुजन युवा आघाडी उपजिल्हाध्यक्ष नंदुरबार, मा. तहसिलदार, शहादा यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली. यामध्ये केंद्र शासनाच्या ८०० मीटर आणि राज्य शासनाच्या २०० मीटर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वीटभट्ट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने याचिकेच्या सुनावणीत या विषयाची गंभीर दखल घेतलेली असून, नियमांचे उल्लंघन हे संविधानातील अनुच्छेद २१, ४८अ आणि ५१अ चे उल्लंघन असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुख्य मागण्या:
नियमबाह्य व वस्तीपासून जवळ असलेल्या वीटभट्ट्यांना तत्काळ बंद करणे
सर्व चालू वीटभट्ट्यांची फेरतपासणी
पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन
दोषी मालकांवर फौजदारी खटले दाखल करणे
संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल अर्जदारास सादर करणे
यावेळी श्री. निकुंभे यांनी सांगितले की, “जर प्रशासनाने तात्काळ योग्य ती कारवाई केली नाही, तर आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून कायदेशीर लढा देऊ.”
या लढ्यामध्ये स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा द्यावा, असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
